भुवनेश्वर- वृत्तसेवा । प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ओडिशाच्या भुवनेश्वरमध्ये अठराव्या अनिवासी भारतीय दिवस परिषदेचे उद्घाटन केले आणि आपल्या भाषणातून प्रवासी भारतीयांसाठी एकात्मतेचा संदेश दिला. या कार्यक्रमात त्यांनी दिल्लीच्या निजामुद्दीन रेल्वे स्थानकावरून “प्रवासी भारतीय एक्सप्रेस”ला हिरवा झेंडा दाखवला.
तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेची थीम होती – “विकसित भारताच्या संकल्पनेत प्रवासी भारतीयांचा सहभाग.” परराष्ट्र मंत्रालय आणि ओडिशा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या परिषदेचे उद्दिष्ट प्रवासी भारतीयांना भारताच्या प्रगतीशी जोडणे आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करणे हे होते.
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात भगवान जगन्नाथ आणि भगवान लिंगराज यांच्या पवित्र भूमीत आलेल्या अनिवासी भारतीयांचे स्वागत करून केली. त्यांनी सांगितले की, महात्मा गांधी 1915 मध्ये याच दिवशी परदेशातून भारतात परतले होते. त्याचप्रमाणे, विविध भारतीय सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर आपल्या प्रवासी कुटुंबाची उपस्थिती भारताच्या उत्सवाला अधिक तेजस्वी बनवते.
मोदी म्हणाले, “भारतीय प्रवासी हे भारताचे खरे राष्ट्रदूत आहेत. ते जिथे जातात, त्या देशाच्या नियमांचा सन्मान करतात आणि त्या समाजाचे महत्त्वाचे भाग होतात. परंतु त्यांच्या हृदयात भारत कायम धडकत असतो.” त्यांनी स्पष्ट केले की भारतीय लोकांचा विविधतेत एकता हे जीवनाचा अविभाज्य भाग आहे.
मोदींनी भारताच्या प्रगतीवर भर दिला. त्यांनी नमूद केले की, “मागील दहा वर्षांत 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे, आणि लवकरच ती तिसऱ्या क्रमांकावर असेल. चंद्रयान-3 च्या यशापासून डिजिटल इंडियाच्या सामर्थ्यापर्यंत, भारताचे सर्व क्षेत्र प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले.
भारताच्या प्रगतीच्या प्रवासात अनिवासी भारतीयांचा सहभाग वाढवणे आणि त्यांना देशाशी अधिक जोडून ठेवणे हा या परिषदेचा मुख्य हेतू आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी ओडिशाच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशावर भर देत सांगितले की, ओडिशा हे केवळ निसर्गसौंदर्याचा खजिना नसून विविध कलात्मक परंपरांचे माहेरघर आहे.
मोदींनी भारतातील बदलांवर भर देताना सांगितले की, “आजचा भारत फक्त स्वतःच्या विकासावर भर देत नाही, तर ग्लोबल साउथच्या आवाजाला उचलतो. डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया अशा अनेक मोहिमांमुळे भारताचे स्थान जागतिक स्तरावर मजबूत झाले आहे.”
Leave a Reply