महायुतीचं ठरलं ! देवेंद्र फडणवीस होणार मुख्यमंत्री

मुंबई-वृत्तसेवा | राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा धुव्वा उडवत महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे. आता निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. अशात महायुतीमधून भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.

भाजपाच्या केंद्रीय नेतृत्त्वाने मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला मंजूरी दिली असून, शिवसेना आणि राष्ट्रवादीनेही या निर्णयला होकार दिला आहे. भाजपामधल्या दोन उच्चपदस्थ नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे. याचबरोबर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असणार आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संध्याकाळी दिल्लीत शिंदे, फडणवीस आणि पवार यांच्यासमवेत सत्तावाटपाचा तपशील आणि मंत्रिमंडळ रचना यावर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली असून त्यानंतर घोषणा अपेक्षित आहे. राज्यात २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. त्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या निकालात महायुतीने बाजी मारत २३० जागांवर विजय मिळवला. यामध्ये भारतीय जनता पार्टीने सर्वाधिक १३२ जागा जिंकल्या. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ५७ जागांवर बाजी मारली. महायुतीतून सर्वात कमी जागा लढवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही ४१ जागांवर विजय मिळवला.

दुसरीकडे सर्वत्र महाविकास आघाडीची सत्ता येणार अशी चर्चा असताना त्यांचा सुपडा साफ झाला. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वाट्याला अवघ्या ४७ जागा आल्या. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने २०, काँग्रेसने १९, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाने १०, समाजवादी पक्षाने २ व शेतकरी कामगार पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष (एम) ने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*