चंद्रशेखर बावनकुळे नंदुरबार जिल्हा दौर्‍यावर !

नंदुरबार-प्रतिनिधी | भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे हे ‘घर चलो संपर्क अभियानाच्या प्रचारासाठी २३ नोव्हेंबर रोजी नंदुरबार जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असल्याची माहिती प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी पत्रकार परीषदेत दिली.

या संदर्भात माहिती देतांना विजय चौधरी म्हणाले की, लोकसभा प्रचारासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे हे घर चलो संपर्क अभियानातून जनतेत जावून संवाद साधत आहेत. २३, २४ व २५ नोव्हेंबर असे ३ दिवस प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे नंदुरबार, धुळे व नाशिक दौर्‍यावर येत आहे. २३ नोव्हेंबर रोजी नंदुरबार येथे घरचलो संपर्क अभियानाची प्रचार रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीद्वारे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे नागरिकांशी संवाद साधतील. तसेच रॅलीच्या मार्गावर ठिकठिकाणी व्यासपीठ उभारुन विविध विषयांवर आधारीत धन्यवाद मोदीजी या संदेशाचे सादरीकरण करण्यात येणार आहे.

दरम्यान, याआधी सकाळी १० वाजता नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात सुपरवॉरियर्स पदाधिकार्‍यांची बैठक होईल. या बैठकीसह अभियान रॅलीत भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी, सांस्कृतिक विभागाचे विकेश राजपूत, माजी नगरसेवक अर्जुन मराठे आदी उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*