
वडनगर-वृत्तसेवा । गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यात वडनगर येथे असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्राथमिक शिक्षणाच्या शाळेचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या शाळेला आता “प्रेरणा स्कूल” असे नाव देण्यात आले असून, १६ जानेवारी रोजी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या हस्ते या शाळेचे उद्घाटन होणार आहे.
या कार्यक्रमादरम्यान, अमित शाह दुपारी २ वाजता एका सार्वजनिक सभेला संबोधित करतील. याशिवाय, ते वडनगर येथे ३३.५० कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या आधुनिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे उद्घाटनही करतील.
सदर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ३४,२३५ चौरस फुटांच्या क्षेत्रात उभारण्यात आला असून, यात कबड्डी, खो-खो, बॅडमिंटन, टेबल टेनिस आणि फुटबॉल यांसारख्या खेळांसाठी जागा उपलब्ध आहे. या ठिकाणी राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करता येतील. खेळाडूंना योग्य प्रशिक्षण मिळण्यासाठी कोचिंग सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या आहेत.
स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये १०० मुलांसाठी आणि १०० मुलींसाठी एक अत्याधुनिक स्पोर्ट्स हॉस्टेल तयार करण्यात आले आहे. या हॉस्टेलमध्ये खेळाडूंसाठी विशेष खोल्या, भेटींसाठी व्हिजिटर रूम, विश्रांतीसाठी रिक्रिएशन रूम, सोलर सिस्टम, आरओ पाणी शुद्धीकरण यंत्रणा, सीसीटीव्हीसह इतर सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.
वडनगर येथील “प्रेरणा कार्यक्रम” अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जुन्या शाळेचे नूतनीकरण भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) विभागाने केले आहे. या शाळेला एक प्रगत शिक्षण संस्था म्हणून विकसित करण्यात आले असून, येथे भविष्यातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे एक उत्तम वातावरण निर्माण केले जात आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या शाळेचे नूतनीकरण आणि वडनगरमध्ये स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या उद्घाटनामुळे या भागातील विकासाला गती मिळणार असून, या सोयी सुविधांमुळे वडनगर आता शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात एक महत्त्वाचे ठिकाण बनेल. उद्या होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये स्थानिक नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.
Leave a Reply