ऑनलाईन फसवणुकीच्या प्रतिकारासाठी ‘क्विक रिस्पॉन्स टिम’ : फडणवीस

नागपूर- प्रतिनिधी | ऑनलाईन आर्थिक फसवणुकीच्या प्रतिकारासाठी राज्यात क्विक रिस्पॉन्स टिमची उभारणी करण्यात येईल अशी महत्वाची घोषणा आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आहे.

कोल्हापूर आणि सांगली येथील गुंतवणूकदारांची ए. एस. ट्रेडर्स आणि त्यांच्या अन्य कंपन्यांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याबाबत भाजप आमदार आशिष शेलार यांनी प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी राज्य सरकार तयार करीत असलेल्या डिजिटल प्लॅटफॉर्मविषयी माहिती दिली. या संदर्भात उपमुख्यमंत्री म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्र्यांनी आयोजित केलेल्या राज्याचे गृहमंत्री आणि पोलिस महासंचालकांच्या बैठकीत राज्य सरकारच्या वतीने क्विक रिस्पॉन्स सिस्टिमविषयी सादरीकरण करण्यात आले होते. अमित शहा यांनी यासंदर्भात अन्य राज्यांना असे मॉडेल तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार आता आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंतर्गत डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केला जाईल. त्यामुळे बँक, वित्तीय संस्था, समाज माध्यमातील विविध ऍप हे एकाच प्लॅटफॉर्मवर येतील, असे फडणवीस म्हणाले.

दरम्यान, ए. एस. ट्रेडर्ससह अन्य आस्थापनांकडून ४० कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणात ३५ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यातील १३ जणांना अटक करण्यात आली. यामध्ये पोलिसांनी पहिले आरोपपत्र सादर केले आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून अन्य राज्यांशी समन्वय साधून पोलिस तपास सुरु आहे. या गुंतवणुकीतील पैसा विदेशात गेला असेल तर पीएमएलए कायद्याअंतर्गत चौकशीसाठी ईडीची मदत घेतली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

तसेच. जनतेची आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंतर्गत सेल तयार केले जातील अशी ग्वाही फडणविसांनी दिली. तसेच, राजकीय नेत्यांसोबत फोटो काढून आपण त्यांच्या जवळचे आहोत, असे भासवून अनेकजण जनतेची फसवणूक करतात. त्यामुळे जनतेने अशा व्यक्तींवर पूर्ण विश्वास ठेवू नये. मात्र, आता तर डीपफेकमध्ये कुणीही कोणासोबतही छायाचित्र जोडून फोटो काढता येतो. त्यामुळे याविषयी जनजागृती करण्याची गरज असल्याचे फडणवीस म्हणाले. आमच्या सोबत कुणी कुणाचे फोटो दाखवले तर त्यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही त्यांनी केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*