जळगाव-प्रतिनिधी | ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या प्रयत्नांसह पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्यामुळे जळगाव येथे कर्मचारी राज्य विमा महामंडळ म्हणजेच ईएसआयसीच्या रूग्णालयांच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
जळगाव शहर व जिल्ह्यातील कामगारांसाठी सर्व सोयी-सुविधांनी युक्त शासकीय रूग्णालय असावे. अशी जिल्ह्यातील कामागारांची अनेक दिवसांपासून मागणी होती. यासाठी खासदार उन्मेष पाटील यांच्या माध्यमातून कामगारांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्र्यांकडे मागणी केली होती. या मागणीची दखल घेत पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना रूग्णालयासाठी जागेचा शोध घेण्याचे निर्देश दिले होते. यासाठी आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व प्रांताधिकारी महेश सुधळकर यांनी पुढाकार घेत सप्टेंबर २०२३ महिन्यात जागेचा शोध घेतला.
यासाठी पाच सदस्यीय समितीने एमआयडीसीतील जागांची पाहणी करून रूग्णालयासाठी भूखंड क्रमांक २१६९४ मध्ये रूग्णालयासाठी ५४२५ चौरस मीटर जागा अंतिम करत एमआयडीसीकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. या प्रस्तावाचा शासनपातळीवर उद्योग मंत्रालयाकडे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाठपुरावा केला. एमआयडीसीने रूग्णालयांसाठी एक रूपया चौरस मीटर प्रमाणे जागा उपलब्ध करून दिली आहे.
याबाबत २३ नोव्हेंबर २०२३ रोजी जळगाव एमआयडीसीचे क्षेत्रीय व्यवस्थापक वासुदेव सपकाळे यांनी राज्य कर्मचारी विमा महामंडळ, मुंबई यांना रूग्णालयासाठी जागा मागणीचा प्रस्ताव ही दिला आहे. परिणामी, राज्य कर्मचारी विमा महामंडळाकडे लवकरच रूग्णालयासाठी जागा हस्तांतरित होणार आहे.

Leave a Reply