शिर्डी – प्रतिनिधी । येथे भारतीय जनता पक्षाचे राज्य अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.
राज्यातून नेते आणि हजारो पदाधिकारी या अधिवेशनासाठी शिर्डीत दाखल होणार आहेत. त्यांच्यासाठी व्यापक निवास व्यवस्था, भोजन नियोजन आणि वाहतूक सुविधा तयार करण्यात आली आहे. शिर्डीतील भक्त निवास, हॉटेल्स आणि इतर स्थानिक सुविधा अधिवेशनासाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत.
अधिवेशनाचा शुभारंभ रविवारी सकाळी १० वाजता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते होणार आहे. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली ध्वजारोहण व प्रतिमा पूजन होईल. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत अधिवेशनाचा समारोप होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपाचे सर्व मंत्री, खासदार, आमदार, तसेच पक्षाचे इतर वरिष्ठ नेते अधिवेशनात सहभागी होणार आहेत.
अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली व्यापक तयारी करण्यात आली आहे. माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील गेल्या आठ दिवसांपासून शिर्डीत तळ ठोकून आहेत. अधिवेशनासाठी मंडप उभारणी, बैठक व्यवस्था, भोजन व्यवस्थापन, वाहनतळ, आणि पदाधिकाऱ्यांच्या निवासाचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. शहरातील रस्ते, दुभाजक, आणि सार्वजनिक ठिकाणांवर दोन हजार भाजपचे झेंडे, स्वागत कमानी आणि आकर्षक फलक लावण्यात आले आहेत, ज्यामुळे संपूर्ण शिर्डी भाजपमय झाली आहे.
भाजपच्या राज्यस्तरीय अधिवेशनाने पक्षाचा आत्मविश्वास आणि संघटनशक्ती अधोरेखित केली आहे. मोठ्या प्रमाणात पदाधिकाऱ्यांची उपस्थिती आणि राष्ट्रीय नेतृत्वाच्या मार्गदर्शनामुळे आगामी निवडणुकांमध्ये पक्षाच्या आक्रमक रणनीतीला बळ मिळणार आहे. शिर्डीतील अधिवेशन भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी मोठा प्रेरणादायी ठरेल. पक्षाच्या संघटनशक्तीला आणि कार्यकर्त्यांच्या योगदानाला अधोरेखित करणारा हा उपक्रम आहे.
Leave a Reply