शरद पवारांना विनोद तावडेंचे सडेतोड प्रत्युत्तर

मुंबई – प्रतिनिधी । राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केलेल्या टीकेला भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

‘वल्लभभाई पटेलांपासून यशवंतराव चव्हाणांनी देशाचं गृहमंत्रिपद भूषवलं, पण ‘तडीपार’ राहिलेला माणूस पहिल्यांदाच गृहमंत्रिपदावर बसला आहे,’ अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली होती. मात्र, या टीकेला भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

सोशल मीडियावर पोस्ट करत तावडेंनी म्हटलं, ‘दाऊदच्या हस्तकांना आपल्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करविणाऱ्या मुख्यमंत्र्यांपेक्षा (म्हणजे शरद पवारांपेक्षा), सोहराबुद्दीनसारख्या लष्कर-ए-तोयबाच्या हस्तक व इस्लामी दहशतवाद्याच्या एन्काउंटरमुळे तडीपार होणे हे देशभक्तीचे लक्षण मानले जाईल.’

आरोप-प्रत्यारोपांची मालिका

१२ जानेवारी रोजी शिर्डीत झालेल्या एका कार्यक्रमात अमित शाह यांनी, ‘शरद पवार यांनी १९७८ मध्ये महाराष्ट्रात विश्वासघाताची परंपरा सुरू केली,’ असा आरोप केला होता. यावर पवारांनी प्रतिउत्तर दिल्यानंतर तावडेंनी पवारांवर हल्लाबोल करत देशभक्तीची व्याख्या मांडली. यात त्यांनी पवार यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

तावडेंनी आपल्या पोस्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आणि आंबेडकर यांचा उल्लेख करत, ‘दाऊदच्या हस्तकांना संरक्षण देणे हे महाराष्ट्राला शोभणारे नाही,’ असे म्हटले. आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्या अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि इतर नेत्यांचा दाखला देत तावडे म्हणाले, ‘ते नेते नंतर मंत्री आणि पंतप्रधान झाले, त्यांच्याबद्दलही पवारांनी असेच विधान केले असते का ?’

जनतेला उत्तर देण्याचे आव्हान

तावडेंनी आपल्या पोस्टमध्ये पवारांना आव्हान दिलं की, देशासाठी कोण काय करतं, कोण देशभक्त आहे, हे महाराष्ट्रातील लोकांना नीट कळतं. पवारांनी जनतेला योग्य माहिती देणं गरजेचं आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*