
दिल्ली-दिल्लीमध्ये आजपासून ‘रेखा सरकार’ची अधिकृत सुरुवात झाली. शालीमार बाग मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आलेल्या रेखा गुप्ता (वय ५० वर्षे) यांनी रामलीला मैदानात भव्य शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या दिल्लीच्या नवव्या आणि चौथ्या महिला मुख्यमंत्री झाल्या आहेत.
रेखा गुप्ता यांच्यापूर्वी सुषमा स्वराज, शीला दीक्षित आणि आतिशी या महिला दिल्लीच्या मुख्यमंत्री राहिल्या आहेत. त्यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपशासित २१ राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित होते. मात्र, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आतिशी या समारंभाला हजर राहिले नाहीत.
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यासह प्रवेश वर्मा, आशीष सूद, मनजिंदर सिंह सिरसा, रविंद्र इंद्राज सिंह, कपिल मिश्रा आणि पंकज कुमार सिंह यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे, प्रवेश वर्मा यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव करत मोठा विजय मिळवला होता.
शपथविधीपूर्वी रेखा गुप्ता यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट शब्दांत सांगितले – “ही एक मोठी जबाबदारी आहे. माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे मी आभार मानते. मी कधीही कल्पना केली नव्हती की मी दिल्लीची मुख्यमंत्री बनेन. मात्र, मी शीशमहलमध्ये राहणार नाही.”
मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान भाजपने ‘शीशमहल’ असे संबोधले होते. कारण माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हे सरकारी निवासस्थान भव्य स्वरूपात बांधण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले होते, असा भाजपचा आरोप होता. निवडणुकीत याच मुद्द्यावरून भाजपने जोरदार प्रचार केला आणि जनतेमध्ये या विषयावरून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.
दिल्लीतील रामलीला मैदानात मोठ्या जल्लोषात शपथविधी पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, दिल्लीचे उपराज्यपाल आणि भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
Leave a Reply