
प्रयागराज-वृत्तसेवा । केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात सहभाग घेतला. त्यांनी गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या पवित्र संगमात स्नान करून आध्यात्मिक अनुभूती मिळवली.
स्नानानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत सांगितले की, “संगमात स्नान करण्याची संधी मिळाल्याने मी स्वतःला धन्य मानतो. हे माझे सौभाग्य आहे की, परमेश्वराने मला या पवित्र स्थळी येण्याची संधी दिली.” राजनाथ सिंह यांनी महाकुंभ मेळ्याचे वर्णन भारतीय संस्कृती व सनातन धर्माच्या अध्यात्मिक आणि सामाजिक समरसतेच्या महान पर्व म्हणून केले. त्यांनी सांगितले की, “गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या पवित्र संगमामध्ये सनातन धर्माची वैज्ञानिकता, अध्यात्म आणि सामाजिक एकतेचा संदेश मिळतो. हा पर्व जगातील सर्वात मोठ्या जनसमुदायाच्या आयोजनांपैकी एक आहे.”
दरम्यान, महाकुंभातील उत्कृष्ट व्यवस्थापनासाठी राजनाथ सिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे विशेष कौतुक केले. “या मेळ्याचे यशस्वी संचालन करण्यासाठी योगी आदित्यनाथ व त्यांच्या प्रशासनाने केलेले काम प्रशंसनीय आहे,” असे ते म्हणाले. ना. सिंह यांनी संगम स्नानाचे फोटो आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ ( ट्विटर) वर शेअर केले. या क्षणांना त्यांनी आध्यात्मिकदृष्ट्या प्रेरणादायक आणि मनःशांती देणारा अनुभव असल्याचे नमूद केले. स्नानानंतर त्यांनी आरतीमध्येही सहभाग घेतला. त्यांच्या सोबत उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री नंद गोपाल नंदी, अनिल राजभर आणि राज्यसभा खासदार सुधांशु त्रिवेदी उपस्थित होते.
Leave a Reply