शिर्डी-प्रतिनिधी । शरद पवार यांचे फुटीचे राजकारण आणि उद्धव ठाकरे यांच्या दगाबाजीला आपण धडा शिकवलं या शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जोरदार हल्लाबोल केला.
शिर्डी येथे भाजपचे राज्यस्तरीय महाअधिवेशन मोठ्या जल्लोषात पार पडले. या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या तडाखेबंद भाषणाने उपस्थित कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली. “शरद पवार यांचे फुटीचे राजकारण आणि उद्धव ठाकरे यांची दगाबाजी यांना धडा शिकवत भाजपने महाराष्ट्रात स्थिर सरकार स्थापन केले,” असे म्हणत शहा यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली.भाषणाच्या सुरुवातीलाच अमित शहा यांनी “जय भवानी, जय शिवाजी”चा नारा देत शिवप्रतिष्ठानाला वंदन केले. त्यांनी जिजाऊंच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहत महाराष्ट्राच्या ऐतिहासिक परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले.
शरद पवारांचे राजकारण जमिनीत गाडले
शहा यांनी शरद पवारांच्या फुटीच्या राजकारणा”वर टीका करत म्हटले, शरद पवारांनी धोकेबाजीचे राजकारण सुरू केले होते. मात्र, भाजपने हे राजकारण 20 फूट जमिनीत गाडून टाकले आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधत, “2019 मध्ये त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा सोडली आणि दगाबाजी केली. महाराष्ट्राच्या जनतेने या दगाबाजांना योग्य जागा दाखवून दिली,” असे स्पष्ट केले.
महायुतीचे यश
शहा यांनी महायुतीच्या ऐतिहासिक विजयाचे श्रेय भाजपच्या कार्यकर्त्यांना दिले. “महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस सरकारवर विश्वास दाखवला आणि राज्यात स्थिरता आणली,” असे त्यांनी नमूद केले. 2024 पर्यंत अस्थिरतेच्या सावटाखाली असलेल्या महाराष्ट्राला भाजपने स्थैर्य दिले आहे. भाजपने राज्यातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी समर्पण दाखवल्याचे त्यांनी सांगितले.
घराणेशाहीला ठोस उत्तर
परिवारवादी राजकारणावर टीका करताना अमित शहा म्हणाले, “तुम्ही परिवारवादाचे राजकारण करणाऱ्यांना महाराष्ट्राच्या जनतेने योग्य उत्तर दिले आहे. महायुतीच्या उमेदवारांनी एकजूट दाखवत मोठा विजय मिळवला आहे.” महाराष्ट्राच्या जनतेने “खरी शिवसेना” म्हणून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाला मान्यता दिली आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा देत पक्षांचे भविष्य उज्ज्वल केले.
40 लाख सदस्यांचा टप्पा गाठला, लक्ष्य दीड कोटीचे !
भाजपच्या सदस्य नोंदणी मोहिमेवर जोर देत शहा म्हणाले, “आपल्या पक्षात सध्या 40 लाख सदस्य आहेत, मात्र हे लक्ष्य दीड कोटींपर्यंत पोहोचवायचे आहे. प्रत्येक बूथवर किमान 250 सदस्य असावेत यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे.” त्यांनी महानगरपालिका, नगरपालिका आणि स्थानिक निवडणुकीत भाजपचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले.
शेतकरी आणि महिला यांना प्राधान्य
शहा यांनी शेतकरी आणि महिलांबद्दल भाजपच्या योजनांवर भर देताना सांगितले, “महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दुष्काळमुक्त करण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने जलयुक्त शिवार योजनेद्वारे महत्त्वाचे काम केले आहे. पाणी पोहोचवण्याचा भाजपचा संकल्प शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणेल.” महिलांना सशक्त करण्याच्या भाजपच्या योजनांवरही त्यांनी भर दिला आणि “राष्ट्रप्रथम” या तत्त्वानुसार जनकल्याणाला पुढे नेण्याचे वचन दिले.
पंचायत ते संसद विजयाचे सूत्र
भाजपच्या आगामी उद्दिष्टांवर प्रकाश टाकताना शहा म्हणाले, “पंचायतपासून संसदपर्यंत भाजपचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आता कामाला लागायचे आहे. विरोधकांना बसायला जागा मिळणार नाही, असे निकाल मिळवण्याचा आपला निर्धार असायला हवा. महानगरपालिका, नगरपालिका आणि इतर स्थानिक निवडणुकांमध्ये भाजपच्या विजयासाठी कार्यकर्त्यांना सक्रिय राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
भाजपच्या विजयाचा मंत्र
अमित शहा यांनी शिर्डीतील अधिवेशनात महायुतीच्या यशाचे महत्त्व स्पष्ट केले आणि भाजपच्या नेतृत्वाखालील विकासाच्या दिशेवर भर दिला. विरोधकांच्या टीका आणि धोरणांना उत्तर देत त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी भाजपचे वचन पुन्हा एकदा दृढ केले. या अधिवेशनाने भाजपला केवळ नवीन ऊर्जा दिली नाही, तर आगामी निवडणुकांसाठी स्पष्ट दिशा देखील दिली. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांना एकजूट होऊन काम करण्याचा संदेश त्यांनी दिला.
Leave a Reply