‘जय शिवाजी-जय भारत’ पदयात्रेत ना. रक्षाताई खडसे सहभागी

पुणे– छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून पुण्यात ‘जय शिवाजी जय भारत’ या भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे आणि 20,000 माय भारत स्वयंसेवकांच्या उपस्थितीत या ऐतिहासिक पदयात्रेचा प्रारंभ झाला.

महाराष्ट्राच्या मातीतून उभ्या ठाकलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, नेतृत्व आणि दूरदृष्टी यांचा जागर घालण्यासाठी ही पदयात्रा निघाली. पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणातून सुरू झालेली ही यात्रा फर्ग्युसन महाविद्यालयाजवळ संपली.

या कार्यक्रमात महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांच्या परिसरात स्वच्छता मोहीम, योगसत्रे, ऐतिहासिक व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या उपक्रमांनी तरुणांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

भारताच्या संविधानाला 75 वर्षे पूर्ण होत असल्याने, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने देशभर 24 ठिकाणी पदयात्रांचे आयोजन केले आहे. पुण्यातील ‘जय शिवाजी जय भारत’ ही सहावी यात्रा असून उर्वरित यात्राही वर्षभरात पार पडणार आहेत.

शिवरायांच्या अद्वितीय पराक्रमाची गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘माय भारत’ पोर्टलद्वारे (www.mybharat.gov.in) तरुणांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते, आणि त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला.

या ऐतिहासिक पदयात्रेत केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी आणि आमदार सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने आदी मान्यवर उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*