
जळगाव-प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यात चालू असलेल्या ‘मेरा युवा भारत’ या आंतरजिल्हा युवा आदानप्रदान कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी युवकांशी संवाद साधला.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात १३ ते १७ फेब्रुवारी दरम्यान राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाच्या पहिल्या दिवशी मुंबईतून आलेल्या २७ युवक-युवतींनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या मुख्य आकर्षणांपैकी एक म्हणजे मंत्री खडसे यांनी जळगावच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि कृषी वारसा युवकांसमोर मांडला, तसेच ‘माय भारत’ पोर्टलची माहिती देऊन युवकांना त्याचे ब्रँड अॅम्बेसेडर बनण्याचे आवाहन केले.
नेहरू युवा केंद्र, जळगाव यांच्या या उपक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट केले. त्यानंतर, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सचिन नांद्रे यांनी युवकांना समाज आणि राष्ट्रनिर्माणातील भूमिकेबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी ‘खेलो इंडिया’ आणि भारताच्या २०३६ ऑलिंपिक स्पर्धेच्या तयारीविषयी माहिती सांगितली. तर, सामाजिक कार्यकर्ते नंदू जाधव यांनी महाराष्ट्रातील बालविवाह प्रश्नांवर चर्चा करून युवकांना जागरूक केले.
मंत्री रक्षाताई खडसे यांनी युवकांशी संवादात जळगावच्या गौरवशाली इतिहासाचा उल्लेख करताना सांगितले, “जळगाव हे केवळ कापूस उत्पादनासाठी नव्हे, तर अजिंठा-वेरूळसारख्या ऐतिहासिक लेण्यांसाठी, संत बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्यिक वारशासाठी आणि शेतकऱ्यांच्या संघर्षगाथेसाठी ओळखले जाते. या विरासतीचा आपण अभिमान बाळगावा आणि तिच्या जोपासनेद्वारे विकासाला गती द्यावी.” त्यांनी ‘माय भारत’ पोर्टलवर युवकांनी स्वतःचे नोंदणी करून देशभरातील सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात युवकांनी सामाजिक समस्यांवर चर्चा करताना विचारलेल्या प्रश्नांना मंत्री खडसे यांनी तर्कसहित उत्तरे दिली. त्यांनी युवकांना सांस्कृतिक ओळख जपण्याचा आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने समस्यांवर मात करण्याचा संदेश दिला. या उपक्रमाच्या पुढील दिवसांत युवक दलाला लालमाती आश्रमशाळा आणि अजिंठा लेण्यांना भेट देण्यात येणार आहे. तसेच, शिक्षण, उद्योजकता, आरोग्य आणि पर्यावरण या विषयांवर व्याख्याने आयोजित करण्यात येतील.
मंत्री खडसे यांनी भारताच्या भविष्यातील योजनांवर प्रकाश टाकत सांगितले, “२०३६ च्या ऑलिंपिकसाठी आपण तयारी सुरू केली पाहिजे. युवकांनी क्रीडा आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रांत एकसारखे योगदान द्यावे. ‘खेलो इंडिया’ सारख्या उपक्रमांद्वारे आपल्याला जागतिक स्पर्धांत भारताचे नाव रोशन करायचे आहे.”
नेहरू युवा केंद्राच्या या आंतरजिल्हा कार्यक्रमामुळे जळगावच्या सांस्कृतिक ओळखीचा प्रसार होत असून, युवकांना राष्ट्रनिर्माणात सहभागी होण्याची प्रेरणा मिळत आहे. मंत्री रक्षाताई खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम युवा शक्तीला नवीन दिशा देणार आहे.
Leave a Reply