रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांच्या प्रचार सभेत विविध मान्यवर उपस्थित होते.
गुजरातचे परिवहन मंत्री मुकेश पटेल, आ. जिग्नेश पटेल, बेटी बचाव बेटी पढावचे संयोजक राजेंद्र फडके, भाजप प्रदेश सदस्य सुरेश धनके, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटिल, राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, बाजार समिती सभापती सचिन पाटील, संचालक गणेश महाजन, जयेश कुयटे, पद्माकर महाजन, प्रल्हाद पाटील, सुनिल पाटील, प्रा. सी. एस. पाटील, मिलींद वायकोळे, महेश चौधरी, वाय. व्ही. पाटील, प्रविण पंडीत, दिलीप पाटील, नितीन पाटील, उमेश महाजन, वंदना पाटील, आणि माजी नगराध्यक्षा रंजना अकोले यांच्यासह भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजीत पवार गट, आणि महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सभेचे प्रास्ताविक पद्माकर महाजन यांनी केले, तर सूत्रसंचलन वासुदेव नरवाडे यांनी केले.
केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी येथे सांगितले की, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या तीन राज्यांतून जाणारा महाकाय प्रकल्प मेगा रिचार्ज योजना अंतिम टप्प्यात असून लवकरच केंद्र शासनाकडून या योजनेला गती मिळणार आहे. 30 ते 40 हजार कोटींच्या मेगा रिचार्ज प्रकल्पावर तांत्रिक काम सुरू असून त्यावर लवकरच कार्यवाही होईल.
केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी आपल्या भाषणात महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्यात त्यांनी सांगितले की, “जगात पाण्यासाठी तिसरे महायुद्ध होणार आहे, मात्र केंद्रातील मोदी सरकारने अटल भुजल योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे गावातील पावसाचे पाणी गावातच व शेतातील पाणी शेतातच जिरवून भुजल पातळी वाढवण्यास मदत होईल. त्यामुळे तिसऱ्या पाणी युद्धात भारताचा समावेश होणार नाही.” केंद्रीय मंत्री पाटील यांनी केंद्रातील भारतीय जनता पक्ष (भा.ज.प.) सरकार आणि गुजरात राज्यातील भाजप सरकार यांचे डबल इंजिन विकास मॉडेलच्या प्रभावावर विशेष भाष्य केले. त्यांचे म्हणणे होते, “गुजरातमध्ये डबल इंजिन सरकारमुळे मोठा विकास होत आहे, आणि विकासाचे गुजराथ मॉडेल महाराष्ट्रातही लागू होणे आवश्यक आहे.” ते पुढे म्हणाले, “मागील अडीच वर्षांत राज्यात विकासाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर मागे पडले आहे. कॉंग्रेसच्या कारकिर्दीत भ्रष्टाचार प्रस्थापित झाला होता, आणि यामुळे देशाचा सत्यानाश झाला. जर कॉंग्रेस सत्तेत आली, तर महिलांच्या योजनांची पूर्तता थांबवली जाईल.” अमोल जावळे यांच्या उमेदवारीसाठी पाटील यांनी जोरदार प्रचार केला आणि मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांना विजयी करण्याचे आवाहन केले. त्यासोबतच, “30 ते 40 हजार कोटीचा मेगा रिचार्ज प्रकल्प (महाकाय पुनर्भरण योजना) लवकरच गती घेतल्याची माहिती दिली आणि या प्रकल्पावर टेक्निकल काम सुरू असल्याचे सांगितले.”
ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन म्हणाले की, सुबत्तेने समृद्ध असलेल्या तालुक्यात मतदारांची तळमळ असणारा आमदार आवश्यक आहे. केंद्र आणि राज्यात भाजप सरकार आल्यास फ्लड कॅनॉलसह विविध महत्त्वाच्या योजना राबविल्या जातील. महायुतीचे शासन आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेट बैठकीत १५ हॉर्स पॉवर पंपांसाठी वीज बिल माफ केले जाईल. तसेच, गरिबांसाठी आणि महिलांसाठी असलेल्या लाडकी बहीण योजनासह महिलांच्या सबलीकरणासाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध योजनांची अंमलबजावणी करतील, असे त्यांनी सांगितले.
केंद्रीय क्रिडा मंत्री रक्षा खडसे म्हणाल्या की, रावेर मतदारसंघात पाच वर्षांत विकास झाला नाही. महाविकास आघाडीने केळी पीक विमा संदर्भात कोणतीही दखल घेतली नाही. मेगा रिचार्ज प्रकल्प लवकर सुरू करण्यासाठी आणि सिंचनाच्या योजनांसाठी जलशक्ति मंत्री सी आर पाटील यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. विरोधी पक्ष भाजपवर जातीयवादी असल्याचा आरोप करत आहेत, पण हिंदू, मुस्लीम आणि सर्व समाजाच्या घटकांपर्यंत केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना पोहोचल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.
Leave a Reply